03/04/2025
डॉ. ज्योती ढगे बनल्या मराठवाड्यातील पहिल्या महिला डीएम निओनेटोलॉजिस्ट
बीड दि. १ (प्रतिनिधी ) येथील डॉ. ज्योती मोरे-ढगे यांनी बालरोग विषयातील प्रतिष्ठित डीएम निओनेटॉलॉजी ही सुपर-स्पेशालिटी पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. त्या मराठवाड्यातील पहिल्या महिला डीएम निओनेटोलॉजिस्ट ठरल्या आहेत. नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक उपचार व संशोधन क्षेत्रात त्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे केवळ शैक्षणिक उत्कृष्टता नसून, नवजात शिशूंच्या उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
डॉ. ज्योती ढगे यांचा शिक्षणातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जोगे श्वरीच्या महाविद्यालय, अंबेजोगाई येथे पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद कॉलेज, लातूर येथे पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथून वैद्यकीयची पदवी मिळवली. पुढे त्यांनी डीएनबी पेडिऍट्रिक्स हैदराबाद येथे पूर्ण केले. नवजात शिशूंच्या उपचारात विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांनी डीएम निओनेटॉलॉजी जयपूर, राजस्थान येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या या प्रवासात त्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या अद्वितीय यशामध्ये त्यांच्या कुटुंबियांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मोलाचा ठरला आहे. त्यांचे पती डॉ. कालिदास ढगे (प्रतिष्ठित बालरोग तज्ज्ञ व नवजातशिशु रोग तज्ज्ञ) यांनी त्यांना लग्नानंतर ही अखंड मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. तसेच त्यांचे दीर डॉ. प्रविण ढगे (माऊली डेंटल हॉस्पिटल, बीड) आणि डॉ. किरण सवासे (जीवनज्योत हॉस्पिटल, बीड) यांनी देखील त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा व मार्गदर्शन दिले. त्यांचे सासर गेवराई तालुक्यातील टाकाळगाव हे असून, माहेर अंबेजोगाई येथील मोरवाडी आहे. त्यांचे सासरे श्री. रोहिदास ढगे आणि सासू सौ मदालसा ढगे यांनी नेहमीच त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचे बळ दिले.डॉ रोहिणी सवासे व डॉ शितल ढगे यांनी डॉ ज्योती यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.